Tuesday, May 12, 2020

आत्मनिर्भर

आत्मनिर्भर 


माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी काल रात्री आठ वाजता लाईव्ह आले होते  तेव्हा सगळे जण अगदी आतुरतेने वाट बघत होते, lockdown 3 संपून 4 होतं, का जनजीवन हळूहळू चालू करायला माननीय मोदी साहेब सांगतील.

आणि माननीय मोदींनी सांगितलं काय तर...

"आत्मनिर्भर भारत" !!


 इतर साधनसामग्री आतापर्यंत परदेशातून आयात करत होतो ती आता भारतात बनवली जात आहे. मेड इन चायना गोष्टींमध्ये आपण भागवत होतो, त्याच आता भारतात बनायला सुरुवात व्हावी अशी आपल्या पंतप्रधानांची इच्छा आहे.

आपल्या देशाची आर्थिक घडी जर आपण आपल्या चांगल्या कार्याने बसवू शकणार असू तर याहून चांगली गोष्ट काहीच नाही!!!

 


"आत्मनिर्भर" या शब्दाबद्दल आपण बोलूया... 


निर्भर म्हणजे अवलंबून असणे. आत्मनिर्भर म्हणजे स्वतःवर अवलंबून असणे.


स्वतःवर अवलंबून असणे म्हणजे काय ?? कुठलाही माणूस एकटा कुठलीच गोष्ट करू शकत नाही. त्याला त्याच्या टिमची किंवा त्याच्या जोडीदाराची साथ लागते.


आत्मनिर्भरता म्हणजे मी जे काम हातात घेतले आहे, मी जे ध्येय ठरवलेलं आहे ते मी माझ्या आत्मविश्वासाच्या बळावर पार पाडू शकेन; ते मी माझ्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन व्यवस्थित यशस्वीरित्या मिळवू शकेन हा विश्वास. त्याच्या बळावर सुरू होणार आपलं सगळं ध्येय प्रेरीत कार्य म्हणजे आत्मनिर्भरता.


या प्रयत्नांनंतर येणार्या यशापयशाची जबाबदारी घेणं म्हणजेही आत्मनिर्भरताच बरं का!!


श्री. विनोबा भावे यांनी आपल्या "गीताई" मध्ये छान श्लोक मांडला आहे.

उद्धरावा स्वयें आत्मा खचू देऊ नये कधी |

आत्माची आपुला बंधू, आत्माची रिपू आपुला ||


किती सोप्या भाषेत त्यांनी आत्मनिर्भरतेचा संदेश दिलेला आहे.


एखादी गोष्ट सुरू करून ती अंतिम ध्येयापर्यंत यशस्वी रित्या पोहोचवणं किंवा करणं हा आत्मविश्वास, त्यासाठी लागणारे बळ, त्यासाठी लागणाऱ्या मेहनत करण्याची तयारी आणि जिद्द आणि कुणावरही मानसिकरीत्या अवलंबून न राहता या सगळ्या गोष्टीतून तरुन जाणे म्हणजेच आत्मनिर्भरता.


तुमच्याकडे वेळ असतो, पैसा असतो, तुमच्याकडे मनुष्यबळ असते; पण एखादी गोष्ट करायची उर्मी तुमच्या आतून यावी लागते.

चार लोकांनी तुम्हाला सांगून हे करा अथवा हे असं करा म्हणून गोष्टी होत नाहीत. ते तुम्ही स्वतः तुमच्या मनाशी ठरवून पार पाडावं लागतं. त्यासाठी लागणारी जिद्द, संयम, चिकाटी हे ही उमजून जागवावं लागेल.

ही आत्मनिर्भरता जर तुम्ही तुमच्या प्रत्येक कामासाठी वापरली तर तुम्ही यशस्वी होणारच.

यश-अपयश, यशाच्या मार्गावर जाताना येणाऱ्या अडचणी, त्यांचा आपण पाहिलेला सामना, त्यामुळे आपण शिकलेला धडा हे सगळे तुम्हाला वेगळा अनुभव देतात आणि  त्या त्या यशाचा मिळणारा आनंद म्हणजे एक वेगळीच नशा असते.


माननीय मोदींनी आपल्याला आत्ता पर्यंत इतक्या छान छान संज्ञांची आठवण करून दिलेली आहे..

"संयम ही संकल्प"

"संकल्प से सिद्धी" 

आणि 

"आत्मनिर्भर भारत"


पूर्ण राष्ट्र आत्मनिर्भर व्हायचं असेल तर त्यातली ही कोटींमध्ये जनगणना आहे, प्रत्येकानी आत्मनिर्भरतेचा थोडा तरी अंश आपल्यात अंगिकारावा. 

आपण जे काम ठरवू त्याची व्यवस्थित आखणी करून सुरुवात करणं, ध्येयाप्रत जाताना लागणाऱ्या काही लोकांची मदत घेणे आणि सगळ्यांना एकजुटीने घेऊन त्या ध्येयापर्यंत नेणे; ही आत्मनिर्भरता जर सगळ्यांनी अंगी बाणवली तर एक विशाल राष्ट्र म्हणून भारताची प्रतिमा जगाच्या नकाशात नक्कीच उजळून निघेल.


तुमच्या मनातील  आत्मनिर्भरतेचा अंकुराला चांगल्या सकारात्मक विचारांचे खत पाणी घाला; नवीन काहीतरी ध्येय ठरवा आणि प्रगती करा.

तरच होईल आपला भारत आत्मनिर्भर.


सुरक्षित रहा, आत्मनिर्भर व्हा.

Monday, May 11, 2020

कोरोना_अर्थव्यवस्था

मी अर्थव्यवस्थेतली तज्ञ नाही, पण जेवढं काही दिसत आहे आजूबाजूला त्यावरचे माझे विचार मांडतेय.. 

Lock down पंचेचाळीस दिवस झालेले आहेत.
सगळे उद्योग धंदे,सामान्यांची आयात-निर्यात,सामान्यांचे मुळात उत्पादन ठप्प आहे, बंद आहे. बरीचशी प्रोडक्शन युनिट्स काम करत नाहीयेत. 
काय काय परिणाम होत असेल या सगळ्याचा !!
वर्क फ्रॉम होम ज्या कर्मचाऱ्यांना शक्य आहे त्यांचे पगार, त्यांचे काम आहे तितकाच चालू आहे. फक्त जाण्यायेण्याचा वेळ वाचतोय आणि इंधन वाचतेय.
 स्टॉक मार्केट उतरण उतरणीला लागलेला आहे. आणि इतक्या दिवसापर्यंत दुर्लक्षिले घटक होते, समाजाचा अर्थव्यवस्थेचा कणा आहेत ते घटक जसे की शेतकरी, दुग्ध व्यवसाय करणारे आणि भुसारी मालाचा व्यापार करणार आहे यांची मात्र दैनंदिन जीवनशैली आणि त्यांचं अर्थार्जन चालू आहे. 

 या उतरणीला लागलेल्या अर्थव्यवस्थेच्या बळी ठरलेले घटक म्हणजे वेठबिगारी कामगार. प्रत्येक शहरात एखादा असा विभाग असतो जिथे रोज सकाळी जवळ साडेसहा पासूनच जत्थेच्या जत्थे जमतात माथाडी कामगारांचे. जे एका दिवसावर, एका दिवसाच्या मिळकतीवर त्यांचं पोट अवलंबून असतं.
पण दळण वळण बंद आहे, उत्पादन बंद आहे, बांधकामे बंद आहेत; त्यामुळे त्या मजुरांचे अर्थार्जन बंद आहे.
 
 परप्रांतीय मजूर एकटे राहतात त्यांना त्यांच्या स्वगृही परतायचं होतं. कित्येक शेकडो किलोमीटर चालत ते लोकं स्वगृही परतले. यामधल्या प्रवासात ते काहीच जीव गेला, काहींच्या तब्येतीचा नुकसान झालं
 सरकारने काही तरी ठोस उपाययोजना करेपर्यंत यांनी घाईघाईत स्वतःचे निर्णय स्वतः घेतले आणि नुकसान करून घेतलं.
 स्वगृही परतल्यानंतर काही दिवस कुटुंबासमवेत व्यतीत करून परत पोटापाण्याचं काय हा प्रश्न त्यांना नक्कीच असेल. आणि परत येतील जेव्हा वेळ येईल तेव्हा तो एक वेगळाच गोंधळ होऊन बसेल कारण एवढ्या लोकांना परत आणणं आणि त्याच्यासाठी परत सगळी सोय करणं हे सरकारसाठी अवघड काम नक्कीच ठरेल.
आपल्या अर्थव्यवस्थेच्या बऱ्याच गोष्टी बाधकाम, कपडालत्ता आणि आयात-निर्यात या गोष्टींवर अवलंबून आहेत. त्यामुळे आपली ढासळलेवली अर्थव्यवस्था उसळी घ्यायला
आपल्याला खूप वेळ लागणार आहे.

एक समाज म्हणून अर्थव्यवस्था सुरळीत व्हायला बरेच वर्ष जावे लागणार आहेत अशा परिस्थितीत वैयक्तिक पातळीवर आपली उपाय योजना काय असावी याबद्दल काही अगदीच छोट्या छोट्या गोष्टींबद्दल मी आज लिहिते आहे.

1.) खर्च कमीत कमी करणे. लॉक डाऊन मध्ये पडून शॉपिंग करणे किंवा घरबसल्या ऑनलाइन शॉपिंग करणे हे दोन्ही ऑप्शन्स बाद आहेत. आपण सगळेच सध्या जीवनावश्यक गोष्टी आहेत त्याच घेतोय. दूध भाजीपाला फळ वगैरे !! हीच सवय लाॅकडाऊन उठल्यानंतर ही सहा ते आठ महिने आपण बाळगावी म्हणजे पैसा आपल्याजवळ आहे त्याची आपोआप बचत होईल.
 2.) बर्‍याच ठिकाणी उत्पादन बंद आहे आयात-निर्यात बंद आहे मजुरांचे काम जाण्याची शक्यता आहे किंवा जे लोक मॅनेजमेंटला आहेत त्यांच्या इथे मनुष्यबळ कपात करा होण्याची शक्यता आहे. अशा लोकांनी जॉब आपला जाऊ शकतो ह्या तयारी नुसार हातात किंवा बँकेत जेवढा पैसा आहे तो व्यवस्थित वापरणे गरजेचे आहे. नोकरी गेली तरी काही कालावधीनंतर ते परत मिळेलच. त्या कालावधीत मानसिक स्थैर्य, आर्थिक स्थैर्य गरजेचे असणार आहे. त्याची तयारी आतापासूनच करावी.
3.) कोणाही कडून कर्ज घेऊ नये. कुणाकडे उधार उसनवारी घेऊ नये. कितीही जवळचा असला तरी. अगदी निकडीच्या क्षणी काही मदत हवी असेल तरच ती घ्यावी कारण पैसा परत करणं ही एक वेगळी डोकेदुखी होऊ शकते. त्यामुळे उधार उसनवारी पासून चार हात लांब रहावे.
4.) वैयक्तिक पातळीवर जेव्हा आर्थिक आणीबाणीचा प्रसंग येईल तेव्हा आपल्याकडचे कुठले रिसोर्सेस आपण वापरू शकतो याची एक यादी तयार करावी. जी आपल्याजवळ आपल्या मनात कायम असली पाहिजे किंवा आपल्याकडे नोंद असली पाहिजे. जसं की एखादी छोटी-मोठी प्रॉपर्टी, सोन्याचे दागिने किंवा बँकेत ठेवलेल्या ठेवी ज्या पुढील आयुष्याच्या सुरक्षिततेसाठी आपण केल्या होत्या, त्याला हात लावायचे आपण ठरवलेलं नव्हतं; पण तरीही आताच्या आर्थिक आणीबाणीच्या काळात काही पर्याय नसल्याने आपल्याला ते वापरावे लागणार आहे. त्याची छोटीशी यादी तयार ठेवावी, आवर्जून याची मानसिक तयारी मानसिक नोंद करून घ्यावी. 5.)काही महिन्यांनी, काही वर्षांनी परत सगळे सुरळीत होणार आहे. त्यानंतरही तुम्ही चांगले तुमचा आधार देण्याचे सोर्सेस चांगले करू शकता. आता सध्या तुम्हाला थोडासा मोकळा वेळ मिळतो आहे, त्यात तुम्ही तुमचे skills आहेत ते वाढवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या नवीन स्किल्स मुळे तुमच्या कार्यक्षेत्रात, तुमच्या पर्सनल लाईफमध्ये काहीतरी फरक पडेल असा प्रयत्न करा.
6.) या सगळ्यातून बाहेर पडताना एक वेगळे, सकारात्मक होऊन जगाला नव्याने सामोरे जा.

Saturday, May 9, 2020

कोरोना_तणाव नियोजन :4





आता अतिशय महत्त्वाचं म्हणजे आपल्या मनाला कसं सांभाळायचं ते बघू..
पहिली गोष्ट म्हणजे परिस्थिती काय आहे हे समजून घ्या. कोरोना इतक्यात काही जाणार नाही. जोपर्यंत त्याच्यावर काही ठोस औषधी उपाययोजना सापडत नाही, तोपर्यंत आपल्याला त्याच्याबरोबर राहायला शिकायचं आहे.


हे समजून घ्या की लाॅक डाऊन म्हणजे आहे त्या ठिकाणी घरात राहाणे.
काही लोकांना ही शिक्षा वाटतेय. ज्यांना सतत बाहेर जाणं, लोकांना भेटणं, गप्पा मारणं-- थोडक्यात कुठल्याही प्रकारे संवाद/ कम्युनिकेशन चालू ठेवणं आवडतं त्यांना हा काळ जास्त त्रासदायक ठरतो; असे लक्षात आलेला आहे.
पण त्याला इलाज काहीच नाही. तुम्ही घरी असूनही संवाद साधू शकता. आजकाल *तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे* आपण व्हिडिओ कॉल करू शकतो, वोईस कॉल करू शकतो.


पहिली आणि सगळ्यात सोपी मनाची मशागत करणारी गोष्ट म्हणजे तुमच्या जवळच्या लोकांशी संवाद साधणे. त्या व्यक्तींमध्ये तुमचा जोडीदार, तुमचे पालक, तुमची मुलं, तुमचे मित्र- मैत्रिणी, तुमचे ऑफिस मित्र किंवा आणखीन कोणीही. तुमच्या मनात भावनांचा कल्लोळ आहे, तो तुम्ही बोलून दाखवता आला पाहिजे.
जवळच्या माणसाशी बोलताना आपल्या शरीरातील संप्रेरकं सक्रीय होतात आणि ती संप्रेरके तणाव हलका करायला मदत करतात. नियमितपणे तुमच्या खास लोकांबरोबर वेळ घालवा.
काही लोकांना मित्रांबरोबर मोकळेपणाने बोलणं शक्य होत नाही किंवा आपलं बोलणं कसं समजून घेतलं जाईल याबद्दल शंका असते किंवा आपलं बोलणं गोपनीय राहील की नाही याबद्दल शंका असते. त्यांच्यासाठी एक आपण डायरी मेंटेन करायला शिकवू शकतो. त्याला आपण नाव देऊ शकतो- stress journal.
तर या 'जर्नल' मध्ये तुमच्या मनात नक्की काय विचार चालू आहेत ते लिहावेत. *त्या विचारांचा तुमच्या शरीरावर काही परिणाम होतो आहे का, तुमच्या वागण्यावर काही परिणाम होतो आहे का, हे सगळं नोंद करावं* आणि काय केलं की तुम्हाला बरं वाटतं हेही नमूद करावं. जेणे करून तुमच्या मनातल्या भावनांचा निचरा होतो.


मन हे जितकं मोठं आहे, जितकं फ्लेक्झिबल आहे; तितके विचार त्यात साचत जातात. आपण खबरदारी घेतली पाहिजे की त्या मनात आपण चांगल्या गोष्टी ठेवू. मनात जर आपण नकारात्मक गोष्टी ठेवल्या किंवा सतत चिंता किंवा काळजी,भीती साठवत राहिलो तर ते आपल्या वागण्या-बोलण्यात प्रतिबिंबित होतं आणि त्याचा त्रास आपल्या जवळच्यांना आणि आपल्या स्वतःला होतो. *मनातल्या नकारात्मक गोष्टींना बाहेर वाट दाखवली पाहिजे*.


Please understand, there is no use of bottling up your emotions. Set them free in a proper manner.


दुसरा मुद्दा परिस्थिती आहे तशी स्वीकारायला शिका. ही परिस्थिती अनिश्चित काळासाठी लांबणार आहे. त्या परिस्थितीला सामोरे जाताना, या नवीन जगाला तोंड देताना काही गोष्टींबाबत आपल्याला तडजोड करावी लागणार आहे. ते स्वीकारायला शिका. प्रॉब्लेम कडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला शिका. यात तुम्ही एकटे नाही आहात. पूर्ण पृथ्वी या संकटाशी सामना करते आहे. दिवसभरातला थोडातरी वेळ सगळ्यांसाठी प्रार्थना करा.

छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायला शिका
. सकाळी उठल्या उठल्या गॅलरीतल्या झाडाला कळी होती, त्याचं सकाळी दहा वाजता पाणी घालताना फुल झालेलं दिसेल. इमारतीच्या शेजारच्या झाडावर एखादा पक्षी घरटं बांधताना दिसेल किंवा इतर दोन पक्षांशी संवाद साधताना दिसेल. अशा छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायला शिका.

तुमच्यासाठी दिवसभरातून कोणीतरी एखादी चांगली गोष्ट केली असेल-- बाॅसने किंवा जोडीदाराने तुम्ही केलेल्या कामाचं कौतुक केलं आहे किंवा मुलांनी तुम्ही केलेल्या पदार्थांचा कौतुक केलं आहे तर त्यांना 'थँक्यू' म्हणायला शिका.

या घटनेतून काहीतरी सकारात्मक शोधा.
लहानपणा नंतर आत्ताच आपल्याला उन्हाळी सुट्टी-- सलग तीन महिने मिळाली आहे. घरच्यांबरोबर, मुलांबरोबर, आई-वडिलांबरोबर ती सत्कारणी लावूया.

जोडीदाराबरोबर इतके दिवस, 24 तास एकमेकांच्या सहवासात राहून कधी वादाची ठिणगी पडू शकते आणि त्याचं मोठ्या भांडणात रूपांतर होऊ लागतं.. पण ते तिथल्या तिथेच मिटवा.
तुम्हाला जी गोष्ट आनंद देते ती रोजच्या रोज ठरवून करा. स्वतःसाठी वेळ देणं ही आत्ताची गरज आहे. एखाद्या छंदाला वाव द्या. जेणेकरून तुम्ही आणि परिणामी संपूर्ण घर आनंदी रहातं.
रोजचे 12 ते 14 तास आपल्याला आपलं घर आणि ऑफिस चं काम आ वासून उभं असतं. ऑफिसचं काम 6 तास करणं गरजेचं, त्यातच दुपारचं जेवण आणि मुलांचं मध्येच काहीतरी शंका-कुशंका, प्रश्न उत्तरे.. हे सगळे चिडचिड न करता जर करायचं असेल तर थोडीशी शिस्तबद्धता आपल्यात आणली पाहिजे.

प्रत्येक दिवसाचा एक रुटीन ठरवा. त्यात नियमितता पाळा. तुमच्या शरीराचं 'बायोलॉजिकल क्लॉक' सेट करून घ्या. ठराविक वेळेला झोपा. ठराविक वेळेला उठा. जेवणाखाण्याची, नाश्त्याची वेळ पण एकच ठरवा आणि त्याप्रमाणे ती रोज आचरणात आणा.


प्रत्येक दिवसाच्या कामांची वर्गवारी करा. जे अति महत्त्वाचं आहे, त्याला किती वेळ द्यायचा आहे ते ठरवा. काही कामं कमी महत्त्वाची असतात ती थोडी पुढेमागे झाली तरी चालू शकतात,पण ती कधी करायची आहे हे नक्की ठरवून घ्या.


सध्या घर आणि ऑफिस या दोन्हीची जबाबदारी असल्याने सगळीकडे धावत सुटू नका. आपल्याला कोणीही 'सुपरवुमन' आणि 'सुपरमॅन' ची पदवी देणार नाही.
घरात जर चार लोक असतील तर त्यांना वयानुरूप कामे वाटून द्या. घरातल्या सदस्यांबरोबर एक छोटीशी मीटिंग घ्या. त्यात कोणी काय काम करायचं हे आपापसात ठरवून घ्या. त्यात थोडी लवचिकता ठेवा. सगळ्यांनी सगळं काम करायचं आहे हे भान आधी स्वतः स्वीकारा.
मग त्यात त्या माणसांनी काम जसं केलं आहे तसेच ते स्वीकारा. असंच केलं पाहिजे, हे काम तसंच केलं पाहिजे, हे अशा पद्धतीने झालं पाहिजे, हे काम इतक्या वेळेतच झालं पाहिजे अशा अटी तुम्ही समोरच्याला घालता पण त्याचा तणाव तुमच्या मनामध्ये साचत जातो.

काम वाटून दिल्यानंतर ते काम कसं करायचं आहे याची जुजबी सूचना द्या आणि वेळेचं एक लिमिट करून द्या पण अगदी 'मिनिट टू मिनिट' त्याच्यावर देखरेख करू नका. काम करणाऱ्याला ही कंटाळा येऊ शकतो.


ऑफिसचं काम करताना आपल्या मनात डोकावत राहतो-अरे बायकोने भांडी घासायला सांगितली होती, अरे देवा कपडे वाळत घालायचे राहिले आहेत, केर कोणी काढला- मुलांनी नीट काढलाय का नाही बघायला पाहिजे... काही गरज नाही!! ऑफिसचं काम करताना ऑफिस काम आणि घरकाम करताना पूर्ण लक्ष त्यात. हवं तर थोडं आधी उठून आवरून घ्या.


पुढच्या चार दिवसांच्या जेवणाचा, नाश्त्याचा मेनू ठरवून ठेवा. त्याची पूर्व तयारी आदल्या दिवशी करून ठेवा. सामानाची जुळवाजुळव त्यादृष्टीने करा म्हणजे या छोट्या-छोट्या गोष्टींचा घरातल्या बाईवरील ताण येतो तो कमी होण्यास मदत होते.


काही सोप्प्या गोष्टी आहेत:
आपल्या पंचेंद्रियांची मदत घ्या- कान, डोळे, जीभ, त्वचा, नाक..
आपल्या आवडीचे, चांगल्या आठवणींचे जुने फोटो बघा.
आता उन्हाळ्याच्या दिवसात गुलमोहर, अमलताश, ताम्हण- ठिकठिकाणी फुललेले दिसतात.रंगीबेरंगी फुले डोळ्यांना आनंद देतात.
आल्हाददायक गाणी ऐका.
छान, चविष्ट जेवण करा.
सुवासिक उदबत्ती देवासमोर लावून पाच मिनिटं जरी प्रार्थना केली हात जोडले तरी ताण खूप कमी होतो. त्याचा सामना करा या छोट्या छोट्या उपायांनी आणि काही मदत लागली तर नक्की संपर्क करा.


खात्रीलायक माहिती मिळवा.

अफवांना भुलू नका.

अतिरंजित video clips बघू नका आणि पुढे प्रेषित करु नका.


डाॅक्टर, नर्सेस, इतर पॅरामेडीकल स्टाफ; सफाई कामगार, पोलिस, साॅफ्टवेअर प्रोग्रॅमर्स ज्यांच्यामुळे work & education from home सुसह्य होतंय, आर्थिक आघाडी सांभाळणारे बॅक कर्मचारी , दैनंदिन सोयी पुरवणारे शेतकरी व दुकानदार सगळेच आपल्यासाठी धडाडीने संकटाला तोंड देत आहेत.

सरकारने आणि डॉक्टरांनी घालून दिलेले नियम पाळा, सुरक्षित रहा!!


पुढील लेखः संभाव्य आर्थिक अडचणी आणि उपाययोजना

x
x
x

कोरोना_तणाव नियोजन : 3

आपण सध्या शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही पातळींवर तणावाशी झुंजतोय.


रोजच्या आपल्या आयुष्यात आपल्याला कळतही नाही असे असंख्य विचार आपल्या मनात येत असतात.
आपलं मन हे खूप मोठे भांडार आहे. त्याचं मोजमाप आपण करूच नाही शकत. चांगले-वाईट, आनंदी, भीतीदायक, काळजीयुक्त चिंता, भूतकाळातील चांगल्या-वाईट घटना, भविष्याची चिंता, वर्तमानाची काळजी असे अगणित विचार आपल्या मनात येत असतात. विचार येणं चुकीचे नाही नक्कीच, पण आपण त्याचा सामना कसा करतो हे महत्त्वाचे आहे.


सामान्यतः कुठलाही तणावपूर्ण प्रसंग असेल किंवा कुठलाही प्रॉब्लेम असेल तेव्हा मानवी मन दोन पद्धतीने त्याला तोंड देतं.
1) एक म्हणजे Flight( पळून जाणे) प्रसंगाला तोंड न देणे.
2)दुसरा म्हणजे fight (लढा) समोर उभा टाकून तणावाशी सामना करणे.


आता अगदीच अनिश्चित काळासाठी आपल्या समोर आलेला जागतिक पातळीवरील साथीचा रोग "कोरोना" उभा टाकला आहे. तो आला आपल्याकडे डिसेंबरमध्येच आणि आपल्या बरोबर कधीपर्यंत राहणार आहे माहिती नाही. सगळ्याच गोष्टींबाबत अनिश्चितता आहे. त्यावर औषध कधी तयार होईल, त्याची लस कधी तयार होईल, केव्हा बाजारात उपलब्ध होईल, ती सामान्यांपर्यंत कशी पोहोचेल--- अनिश्चितता आहे.
त्यामुळे या प्रसंगापासून पळून जाऊन तुम्ही तुमच्या शहरातून दुसऱ्या शहरात/देशात जाऊ शकत नाही आणि तुमचं मनही या गोष्टीला विलग करू शकत नाही.

आपल्याकडे उपाय उरतो तो म्हणजे सामना करणे.
कोरोनाशी लढताना काही गोष्टी आहेत ज्या लिहिताना मला खूप सोप्या वाटतात पण आचरणात आणताना आपल्यासारख्यांना त्या खूप अवघड वाटतात.
जसं की झोप--आठ ते दहा तास झोप प्रत्येक माणसाला अतिशय गरजेची आहे. ती मिळाली नाही तर त्याचा परिणाम आपल्या दुसऱ्या दिवशीच्या वागण्यावर होतो. सुट्टी आहे म्हणून किंवा वेळेचे बंधन नाहीये म्हणून रात्री उशिरापर्यंत वेबसिरीज बघणे सकाळी उशिरा उठणे, रात्री-अपरात्री उठून मोबाईल वरती व्हाट्सअप किंवा फेसबुक चेक करणे अतिशय हानिकारक आहे. हे ताबडतोब बंद करा. कमीत कमी आठ तास झोप हे आपल्याला मिळालीच पाहिजे.
पौष्टिक अन्न : अजून तरी आपल्याला व्यवस्थित भाजीपाला, धनधान्य, इतर खायच्या गोष्टी मिळत आहेत. व्यवस्थित नाश्ता- जेवण, रात्रीचे जेवण विभागून घ्या. आवश्‍यकतेनुसार कॅलरीज् चं प्रमाण ठरवून घ्या आणि त्याप्रमाणे तुमचा आहार ठरवा.
व्यायाम : व्यायाम करण्यासाठी सध्या बाहेर पडू शकत नाही आहोत पण घरच्या घरी खोलीतल्या एका टोकापासून बाहेरच्या खोलीच्या दुसर्‍या टोकापर्यंत पाऊले मोजा; ठराविक पावलांचा आकडा तुम्ही ठरवून घ्या आणि तेवढी पावलं रोज चाला. सुछरुवातीला हळूहळू चाला आणि त्यानंतर त्याचे रूपांतर ब्रिस्क वॉकिंग म्हणजे लगबगीने चालणे जेणेकरून तुमच्या हृदयाला रक्तपुरवठा सुरळित होईल.
अजून एक व्यायाम प्रकार म्हणजे योगासनं! सोपी योगासने-- प्राणायाम, अनुलोम-विलोम, कपालभाती हे तुम्ही अगदी सहजासहजी करू शकता.
व्यायाम करताना अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे शारीरिक हालचाली आणि श्वासोच्छ्वास यांचा समन्वय साधणे. सुरुवातीला थोडं अवघड जातं. प्रयत्नपूर्वक लक्ष द्या-- तुमच्या शारीरिक हालचालींची गती आणि तुमच्या श्वासोच्छ्वासाची गती यात समन्वय साधला की व्यायाम करताना तुम्हाला लय सापडेल आणि तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकाल. याचा आपल्या शरीराला जास्त चांगला फायदा होतो.
व्यायाम करताना तुम्ही अशी वेळ ठरवू शकता जेणेकरून कुटुंबातील सर्वजण एकत्र जमून व्यायाम करू शकाल. तुम्हाला एकत्र वेळ व्यतीत करता येईल.
आणखीन एक गोष्ट म्हणजे मद्य, तंबाखू- सिगरेट्स आणि अतिरिक्त प्रमाणात साखर यांचा वापर टाळा.
हे झालं शारीरिक पातळीवर सामना कसा करायचा.
पुढील भागात बघू मानसिक पातळीवर तणावाशी कसं लढायचं !

Friday, May 8, 2020

कोरोना_तणाव : 2

 लाॅकडाऊन चे आता जवळ जवळ 45 दिवस झाले आहेत. मला 2 मुली वय वर्षे 8 व 3; अनन्या व अस्मि अनुक्रमे.
 सुरूवातीला सुट्टी लागली, परीक्षा रद्द या आनंदात वेळ छान गेला.
पण मग लगेच 4 दिवसात या सुट्टीत करायचं तरी काय हा प्रश्न पडलाच! 
मग घेतलं दोघींना हाताशी.. एक दिवस दोघींनाही पोळी लाटायला दिली. बसल्या लाटत. अनन्या रोज बघायची मला लाटताना, तिने अलगद लाटायला सुरू केलं. अस्मि ने जोराजोरात लाटलं आणि त्याचा अगदी पापड झाला.. दोघींनी दिलेला जोर कमी जास्त झाला आणि पोळ्या काही जमेनात.. मग अनन्याची चिडचिड ..आई तुला कशी गोल येते लाटता, मला कधी येईल!!
अस्मि निवांत 15 मिनिटे एक छोटुसा गोळा घेऊन लाटत राहिली ..कधी त्या गोळ्याचा उंदिरमामा केला, कधी फूल केलं.. कधी बाॅल केला...

सध्याच्या तणावजन्य परिस्थितीचही तसंच आहे नाही का... ताण सगळ्यांनाच आहे:
-कोरोना समूळ कधी नष्ट होईल?
-कोरोनावर लस तरी कधी येईल?
-कोरोना जवळपास कुणाला झाला तर मग काय?
-आपल्याला काही झालं तर घरच्यांचं कसं होईल?
-Lockdown असंच वाढत राहिलं तर ऑफिसेस, शैक्षणिक संस्था, उद्योगधंदे कधी पर्यंत बंद रहातील आणि आपलं किती नुकसान होईल?

या सततच्या ताणाखाली सगळे वावरतोय आपण.. काही जण त्यातून मार्ग शोधत आहेत.. सलग वेळ मिळतोय तर एखादी कला- गायन, नृत्य, पाककला; एखादा छंद जोपासत आहेत-वाचन, बागकाम, चित्र काढणे, रंगवणे इ.

काही लोकांना या सगळ्याचा इतका ताण येतोय की त्यांची चिडचिड वाढली आहे.
ताण जेव्हा जास्त होतो तेव्हा तो अशा प्रकारे बाहेर पडतो:
•राग
•भीति
•काळजी
•असुरक्षितता
•कशातच मन न रमणे- उदासिनता.

Lockdownच्या 45 व्या दिवशी काहींनी ही दिनचर्या स्वीकारली आहे.
काहींना हे अजूनही जड जात आहे. 
याच मुख्य कारण: 
•आपलं ध्येय आता फक्त कोरोनापासून सांभाळून रहाणं हे आहे. 
•ज्या गोष्टींची आपल्याला नकळत सवय झाली होती त्या आता सहजासहजी मिळत नाहीयेत.
•आर्थिक अडचणी- काहींच्या नोकरीची टांगती तलवार आहे, काहींचे उद्योग ठप्प आहेत. हातावर पोट असणारे तर फारच कठीण दिवस बघत आहेत.
•अशाश्वतता- कधी संपणार सगळं, रोज उठून आकडा किती झाला, आपल्या भागातला किती झाला.
•असहाय्यता- कुणाकडेच याची उत्तरे नाहीत त्यामुळे हतबल वाटतं.

मनात इतके सगळे विचार आणि काळजी असतात ते बाहेर पडतात:
•चिडचिड
•रडणे
•अति खाणे किंवा उपासमार करून घेणे
•कुणाशी संपर्क साधणे बंद करणे.

मानवी मन कुठलीही नवी -चांगली ,वाईट गोष्ट समोर आली तर ठराविक टप्प्यांमधून त्याचा स्वीकार करत जातं. ती घटना जर नकारात्मक असेल तर हे टप्पे लांबत जातात.
- Denial: स्वीकार न करणे
-Anger: राग येणे
- Bargaining: चल काहीतरी निघेल मार्ग, आज नाही तर उद्या.
-Depression: हतबलता.. 
- Acceptance: आहे ती परिस्थिती स्वीकारणे व त्यानुसार दिनचर्या ठरवणे.

काही लोकं पटापट हे टप्पे पार करतात आणि काही लोक मध्येच बराच वेळ रेंगाळतात.
हे टप्पे कमी त्रासदायक कसे करावेत हे बघुया पुढील भागात.

घरी रहा, सुरक्षित रहा, संपर्कात रहा.





Thursday, May 7, 2020

कोरोना_मानसिक ताणतणाव 1

"स्वयंपाकाचा कंटाळा आलाय मला... मीच एकटीने चार चार वेळा सगळ्यांच्या आवडीचं करत रहायचं..."

"हे work from home आहे की work for home आहे काही कळतंच नाहीए..."

"Patience तरी किती ठेवणार मी.. बाळ लहान आहे..त्यात घरकाम, बाई नाही, स्वयंपाक काम, बाळाचे शी शू चे कपडे धुवा.. सगळं झालं की परत बाळाला घेऊन बसा.. बाळाचा बाबा सारखं callवर मग काय.."

" हे लोक काही ऐकत नाहीत... सोट्टे दिले की बातमी मोठी करून सांगतात पण घरात रहा हे साधं समजत नाही"

" लॅब मध्ये सारखे सॅम्पल्स येत आहेत, मान मोडून काम करावं लागतंय.. वेळेत नमुने तपासून reports पोचले पाहिजेत hospital ला..तरच त्वरीत पुढील कार्यवाही करता येईल"

" साधं PPE Kit नाही देऊ शकत आहे संस्था.. बसायची फुरसत नाही, इतके patients बघतोय आम्ही, आमच्या जीवाची किंमत शून्य.. मग काही झालं की मार खायला आम्ही आहोतच"

" सध्या तरी राजकारण नको, सहाय्याने काम करु.. लोकांना काय उत्तर देणार आपण"

" खायला पैसे नाहीत आणि हा जाऊन उभा प्यायला.. कामावर कुणी घेईना.. जायचं झालं तर कसं जाणार?"

" कचरा किती करतात लोक.. उगाच पदार्थ करतात.. नाही आवडला की फेकून देतात"

किती विचार असे मांडता येतील प्रातिनिधिक स्वरुपात.. या कठीण समयी प्रत्येकाचं परीघ वेगळं, प्रत्येकाची विवंचना वेगळी.. त्याची तीव्रता वेगळी..
समाजातील हर एक घटकाला या कोरोनाने जेरीस आणलंय..
नोकरदार चिंतेत की नोकरी राहिल का जाईल.. व्यावसायिक चिंतेत की उद्योग ठप्प आहे, उत्त्पन्न नाही, तर विक्री कशी होणार.. फायदा तर दूरच घातलेलं भांडवल तरी मिळायला हवं.. staff ला पगार द्यायचा तरी कसा??

गृहिणी घरकाम करुन हवालदिल तर काम करणारी मदतनीस मावशी ताई परत कामावर कधी घेईल या चिंतेत.. तोवर घर कसं चालेल आणि पोट कसं भरेल!!

लहान मुले शाळा बंद परीक्षा नाही या आनंदात तर त्याबरोबरच बाहेर खेळायला आई का सोडत नाही या प्रश्नात..

सरकारला आर्थिक चिंता, लोकांना सेवा पुरवण्याचा ताण, परत सगळीकडून होत असलेला भडीमाराला तोंड कसं द्यायचं हा प्रश्न..
.
.
.

आपण हे सगळं कसं सांभाळत आहोत? गेले दोन महिने हा सतत ताण आपण झेलतोय, पुढे किती दिवस सहन करावा लागेल माहिती नाही. या ताणामुळे शरीरावर काय परिणाम होतोय हे आत्ता नाही जाणवत. नंतर या त्रासाला तोंड द्यायलाच मोठी यंत्रणा उभी करावी लागेल.

सध्या इतकं करूया की रोज मिनीटभर प्रार्थना करू हे संकट लवकर संपेल.
सरकारने घालून दिलेले नियम पाळून शासनयंत्रणेवरचा ताण कमी करू.
पौष्टिक खाऊन तब्येत चांगली ठेवू.
प्राणायाम करून मन सशक्त करू. विचारात सुसूत्रता आणूया.

सगळेच जणं एकाच वादळात अडकलो आहोत. एकमेकांशी प्रेमाने वागून, एकमेकांच्या मदतीने यातून सुखरूप बाहेर पडूया.




कोरोना_मानसिक ताणतणाव !

परिस्थिती कशीही असो मानवी मन चिंता करायचं सोडत नाही. स्वभावधर्म आहे तो, बदलणं अवघड आहे.
गेले कित्येक महिने आपण सगळेच या तणावाखाली आहोत की कधी हे संपेल, आप्तेष्टांना काही होईल का, झालं तर पुढे काय!!??...

एक मिनिटभर विचार करा, कोरोनापूर्वी ही आपल्याला काही नं काही विवंचना होतीच.. स्वरूप व तीव्रता वेगळी होती.

आत्ता त्याचा focus पूर्ण बदलून मुख्यतः तब्येत चांगली ठेवणं, समाजात वावरताना सांभाळून रहाणं, आणि आपला/जवळच्यांना गमावणं याची भीति, सुखासीन lifestyle, househelp नसणे, अंतिमतः घरकाम जास्त करावं लागणे ; अर्थाजनाचे मार्ग अवघड होणे, उद्योगधंदे बसणे इ.
आणि या सगळ्याची अशाश्वतता हा आहे..

ताण हलका करण्यासाठी थोडंसं defocusing हे तंत्र वापरूया.. त्यात नकारात्मक गोष्टी जसं की househelp नाही म्हणून घरकाम जास्त, कोरोना झाला तर काय ही भीति, आर्थिक अडचणी हे विचारांमध्ये आणायचंच नाही.. 

फोकस फक्त तब्येतीस जपून रहाणे, व्यायाम शरीरासाठी आणि प्राणायाम मनासाठी करणे. कमीत कमी बाहेर पडणे इ.

जेव्हा आपण सगळ्यांचे प्रश्न सोडवू शकत नाही, किंबहुना ही अशी परिस्थिती आहे की एकट्या माणसाच्या हाताबाहेर आहे हे सगळं सावरणं, तेव्हा आपण आपलं मनोबल वाढवणं आणि शक्य तितकी सकारात्मक ऊर्जा निर्माण करणं गरजेचं आहे.

अतिश्रमाने (मानसिक, शारिरीक) कधीतरी असं वाटणं स्वाभाविक आहे, पण त्यातून सावरून परत उभं रहाणं ही सध्याची गरज आहे.

मनोबल वाढवा, सुरक्षित रहा.
-डाॅ.गीता

प्रवाह..



     प्रवाह...
क्षणभर होतो स्तब्ध प्रवाह
अविचल हा मनाचा डोह
रम्य गूढ कल्लोळ चाले
काठावरून कुणी देई हिंदोळे 

मनतरंग उठतील कधी हे
शब्दातीत हे भावनांचे पिसारे
दूर कुठे चातकाची हलचल
ओसंडतील कधी हे बांध सारे

अनवट अशी चाहूल असे ही
नभाआडून इंद्रधनु डोकवे
सरतील हे घनमेघकृष्णही
येतील सरींवर सरी बरसूनी

डोहावर बरसतील तुषार अखंड
नसतील मनावर साखळदंड
चहूबाजूंनी होईल ही धरती
निरभ्र, स्वच्छ, निर्मय, स्वच्छंद !!

- डाॅ. सौ. गीता पुरंदरे.
फोटो : कलपेट्टी,  वायानाड, केरळ.

पावसाळा..तब्येत सांभाळा!

जुलै सुरू झालाय.. पाऊस जोर धरतोय.. निसर्गाच्या हिरव्या व निळ्या रंगाच्या उधळणी बरोबर वातावरणात बदल होत आहेत. पावसाळा ऋतु पचन मंदावणारा व हम...