Saturday, May 9, 2020

कोरोना_तणाव नियोजन :4





आता अतिशय महत्त्वाचं म्हणजे आपल्या मनाला कसं सांभाळायचं ते बघू..
पहिली गोष्ट म्हणजे परिस्थिती काय आहे हे समजून घ्या. कोरोना इतक्यात काही जाणार नाही. जोपर्यंत त्याच्यावर काही ठोस औषधी उपाययोजना सापडत नाही, तोपर्यंत आपल्याला त्याच्याबरोबर राहायला शिकायचं आहे.


हे समजून घ्या की लाॅक डाऊन म्हणजे आहे त्या ठिकाणी घरात राहाणे.
काही लोकांना ही शिक्षा वाटतेय. ज्यांना सतत बाहेर जाणं, लोकांना भेटणं, गप्पा मारणं-- थोडक्यात कुठल्याही प्रकारे संवाद/ कम्युनिकेशन चालू ठेवणं आवडतं त्यांना हा काळ जास्त त्रासदायक ठरतो; असे लक्षात आलेला आहे.
पण त्याला इलाज काहीच नाही. तुम्ही घरी असूनही संवाद साधू शकता. आजकाल *तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे* आपण व्हिडिओ कॉल करू शकतो, वोईस कॉल करू शकतो.


पहिली आणि सगळ्यात सोपी मनाची मशागत करणारी गोष्ट म्हणजे तुमच्या जवळच्या लोकांशी संवाद साधणे. त्या व्यक्तींमध्ये तुमचा जोडीदार, तुमचे पालक, तुमची मुलं, तुमचे मित्र- मैत्रिणी, तुमचे ऑफिस मित्र किंवा आणखीन कोणीही. तुमच्या मनात भावनांचा कल्लोळ आहे, तो तुम्ही बोलून दाखवता आला पाहिजे.
जवळच्या माणसाशी बोलताना आपल्या शरीरातील संप्रेरकं सक्रीय होतात आणि ती संप्रेरके तणाव हलका करायला मदत करतात. नियमितपणे तुमच्या खास लोकांबरोबर वेळ घालवा.
काही लोकांना मित्रांबरोबर मोकळेपणाने बोलणं शक्य होत नाही किंवा आपलं बोलणं कसं समजून घेतलं जाईल याबद्दल शंका असते किंवा आपलं बोलणं गोपनीय राहील की नाही याबद्दल शंका असते. त्यांच्यासाठी एक आपण डायरी मेंटेन करायला शिकवू शकतो. त्याला आपण नाव देऊ शकतो- stress journal.
तर या 'जर्नल' मध्ये तुमच्या मनात नक्की काय विचार चालू आहेत ते लिहावेत. *त्या विचारांचा तुमच्या शरीरावर काही परिणाम होतो आहे का, तुमच्या वागण्यावर काही परिणाम होतो आहे का, हे सगळं नोंद करावं* आणि काय केलं की तुम्हाला बरं वाटतं हेही नमूद करावं. जेणे करून तुमच्या मनातल्या भावनांचा निचरा होतो.


मन हे जितकं मोठं आहे, जितकं फ्लेक्झिबल आहे; तितके विचार त्यात साचत जातात. आपण खबरदारी घेतली पाहिजे की त्या मनात आपण चांगल्या गोष्टी ठेवू. मनात जर आपण नकारात्मक गोष्टी ठेवल्या किंवा सतत चिंता किंवा काळजी,भीती साठवत राहिलो तर ते आपल्या वागण्या-बोलण्यात प्रतिबिंबित होतं आणि त्याचा त्रास आपल्या जवळच्यांना आणि आपल्या स्वतःला होतो. *मनातल्या नकारात्मक गोष्टींना बाहेर वाट दाखवली पाहिजे*.


Please understand, there is no use of bottling up your emotions. Set them free in a proper manner.


दुसरा मुद्दा परिस्थिती आहे तशी स्वीकारायला शिका. ही परिस्थिती अनिश्चित काळासाठी लांबणार आहे. त्या परिस्थितीला सामोरे जाताना, या नवीन जगाला तोंड देताना काही गोष्टींबाबत आपल्याला तडजोड करावी लागणार आहे. ते स्वीकारायला शिका. प्रॉब्लेम कडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला शिका. यात तुम्ही एकटे नाही आहात. पूर्ण पृथ्वी या संकटाशी सामना करते आहे. दिवसभरातला थोडातरी वेळ सगळ्यांसाठी प्रार्थना करा.

छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायला शिका
. सकाळी उठल्या उठल्या गॅलरीतल्या झाडाला कळी होती, त्याचं सकाळी दहा वाजता पाणी घालताना फुल झालेलं दिसेल. इमारतीच्या शेजारच्या झाडावर एखादा पक्षी घरटं बांधताना दिसेल किंवा इतर दोन पक्षांशी संवाद साधताना दिसेल. अशा छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायला शिका.

तुमच्यासाठी दिवसभरातून कोणीतरी एखादी चांगली गोष्ट केली असेल-- बाॅसने किंवा जोडीदाराने तुम्ही केलेल्या कामाचं कौतुक केलं आहे किंवा मुलांनी तुम्ही केलेल्या पदार्थांचा कौतुक केलं आहे तर त्यांना 'थँक्यू' म्हणायला शिका.

या घटनेतून काहीतरी सकारात्मक शोधा.
लहानपणा नंतर आत्ताच आपल्याला उन्हाळी सुट्टी-- सलग तीन महिने मिळाली आहे. घरच्यांबरोबर, मुलांबरोबर, आई-वडिलांबरोबर ती सत्कारणी लावूया.

जोडीदाराबरोबर इतके दिवस, 24 तास एकमेकांच्या सहवासात राहून कधी वादाची ठिणगी पडू शकते आणि त्याचं मोठ्या भांडणात रूपांतर होऊ लागतं.. पण ते तिथल्या तिथेच मिटवा.
तुम्हाला जी गोष्ट आनंद देते ती रोजच्या रोज ठरवून करा. स्वतःसाठी वेळ देणं ही आत्ताची गरज आहे. एखाद्या छंदाला वाव द्या. जेणेकरून तुम्ही आणि परिणामी संपूर्ण घर आनंदी रहातं.
रोजचे 12 ते 14 तास आपल्याला आपलं घर आणि ऑफिस चं काम आ वासून उभं असतं. ऑफिसचं काम 6 तास करणं गरजेचं, त्यातच दुपारचं जेवण आणि मुलांचं मध्येच काहीतरी शंका-कुशंका, प्रश्न उत्तरे.. हे सगळे चिडचिड न करता जर करायचं असेल तर थोडीशी शिस्तबद्धता आपल्यात आणली पाहिजे.

प्रत्येक दिवसाचा एक रुटीन ठरवा. त्यात नियमितता पाळा. तुमच्या शरीराचं 'बायोलॉजिकल क्लॉक' सेट करून घ्या. ठराविक वेळेला झोपा. ठराविक वेळेला उठा. जेवणाखाण्याची, नाश्त्याची वेळ पण एकच ठरवा आणि त्याप्रमाणे ती रोज आचरणात आणा.


प्रत्येक दिवसाच्या कामांची वर्गवारी करा. जे अति महत्त्वाचं आहे, त्याला किती वेळ द्यायचा आहे ते ठरवा. काही कामं कमी महत्त्वाची असतात ती थोडी पुढेमागे झाली तरी चालू शकतात,पण ती कधी करायची आहे हे नक्की ठरवून घ्या.


सध्या घर आणि ऑफिस या दोन्हीची जबाबदारी असल्याने सगळीकडे धावत सुटू नका. आपल्याला कोणीही 'सुपरवुमन' आणि 'सुपरमॅन' ची पदवी देणार नाही.
घरात जर चार लोक असतील तर त्यांना वयानुरूप कामे वाटून द्या. घरातल्या सदस्यांबरोबर एक छोटीशी मीटिंग घ्या. त्यात कोणी काय काम करायचं हे आपापसात ठरवून घ्या. त्यात थोडी लवचिकता ठेवा. सगळ्यांनी सगळं काम करायचं आहे हे भान आधी स्वतः स्वीकारा.
मग त्यात त्या माणसांनी काम जसं केलं आहे तसेच ते स्वीकारा. असंच केलं पाहिजे, हे काम तसंच केलं पाहिजे, हे अशा पद्धतीने झालं पाहिजे, हे काम इतक्या वेळेतच झालं पाहिजे अशा अटी तुम्ही समोरच्याला घालता पण त्याचा तणाव तुमच्या मनामध्ये साचत जातो.

काम वाटून दिल्यानंतर ते काम कसं करायचं आहे याची जुजबी सूचना द्या आणि वेळेचं एक लिमिट करून द्या पण अगदी 'मिनिट टू मिनिट' त्याच्यावर देखरेख करू नका. काम करणाऱ्याला ही कंटाळा येऊ शकतो.


ऑफिसचं काम करताना आपल्या मनात डोकावत राहतो-अरे बायकोने भांडी घासायला सांगितली होती, अरे देवा कपडे वाळत घालायचे राहिले आहेत, केर कोणी काढला- मुलांनी नीट काढलाय का नाही बघायला पाहिजे... काही गरज नाही!! ऑफिसचं काम करताना ऑफिस काम आणि घरकाम करताना पूर्ण लक्ष त्यात. हवं तर थोडं आधी उठून आवरून घ्या.


पुढच्या चार दिवसांच्या जेवणाचा, नाश्त्याचा मेनू ठरवून ठेवा. त्याची पूर्व तयारी आदल्या दिवशी करून ठेवा. सामानाची जुळवाजुळव त्यादृष्टीने करा म्हणजे या छोट्या-छोट्या गोष्टींचा घरातल्या बाईवरील ताण येतो तो कमी होण्यास मदत होते.


काही सोप्प्या गोष्टी आहेत:
आपल्या पंचेंद्रियांची मदत घ्या- कान, डोळे, जीभ, त्वचा, नाक..
आपल्या आवडीचे, चांगल्या आठवणींचे जुने फोटो बघा.
आता उन्हाळ्याच्या दिवसात गुलमोहर, अमलताश, ताम्हण- ठिकठिकाणी फुललेले दिसतात.रंगीबेरंगी फुले डोळ्यांना आनंद देतात.
आल्हाददायक गाणी ऐका.
छान, चविष्ट जेवण करा.
सुवासिक उदबत्ती देवासमोर लावून पाच मिनिटं जरी प्रार्थना केली हात जोडले तरी ताण खूप कमी होतो. त्याचा सामना करा या छोट्या छोट्या उपायांनी आणि काही मदत लागली तर नक्की संपर्क करा.


खात्रीलायक माहिती मिळवा.

अफवांना भुलू नका.

अतिरंजित video clips बघू नका आणि पुढे प्रेषित करु नका.


डाॅक्टर, नर्सेस, इतर पॅरामेडीकल स्टाफ; सफाई कामगार, पोलिस, साॅफ्टवेअर प्रोग्रॅमर्स ज्यांच्यामुळे work & education from home सुसह्य होतंय, आर्थिक आघाडी सांभाळणारे बॅक कर्मचारी , दैनंदिन सोयी पुरवणारे शेतकरी व दुकानदार सगळेच आपल्यासाठी धडाडीने संकटाला तोंड देत आहेत.

सरकारने आणि डॉक्टरांनी घालून दिलेले नियम पाळा, सुरक्षित रहा!!


पुढील लेखः संभाव्य आर्थिक अडचणी आणि उपाययोजना

x
x
x

3 comments:

  1. या रिकाम्या वेळेत टेलिपथीची प्रँक्टिस करता येईल असे वाटते

    ReplyDelete
    Replies
    1. Its a science. Learned should do.. नाहीतर waves कुठे भलतीकडेच जायच्या ☺️

      Delete
  2. Khup sunder, Chan lihiley she.

    ReplyDelete

पावसाळा..तब्येत सांभाळा!

जुलै सुरू झालाय.. पाऊस जोर धरतोय.. निसर्गाच्या हिरव्या व निळ्या रंगाच्या उधळणी बरोबर वातावरणात बदल होत आहेत. पावसाळा ऋतु पचन मंदावणारा व हम...